Publisher's Synopsis
विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी. ही कांदबरी घडते ती इस्तंबूल शहरामध्ये अठराव्या शतकात. तिथल्या समाजाला असलेल्या ट्यूलिप फुलांच्या वेडामुळे या काळाला टयूलिप युग या नावाने ओळखले जाते. त्या काळातला प्रसिद्ध कलाकार तिसरा सुलतान अहमद आणि राजवाड्यातल्या स्त्रिया ही या कांदबरीतील प्रमुख पात्रे. या कांदबरीतले सुलतानाचे चित्रीकरण अनोखे आहे; कुठल्याही सर्वसाधारण माणसाप्रमाणेच त्याच्यातही उणिवा आहेत; त्यालाही छोटेछोटे आनंद आणि सुखे हवी आहेत. त्याच्या प्रमुख चित्रकाराबरोबरचे त्याचे नाते, त्यांची हितगुजे आणि प्रामाणिक कबुलीजबाब यांतून सुलतान उभा राहतो. जनानखान्यातल्या स्त्रियांबरोबर असलेले सुलतानाचे नाते; आणि राजप्रासादात आलेल्या फ्रेंच मुलीवरचे त्याचे प्रेम हे सुलतान आणि त्या स्त्रिया यांच्या दृष्टिकोनातून दाखवलेले आहे. एका पुरुष कवीवरच्या आणि त्याचवेळी एका रखेलीवरच्या प्रेमात लेवनीची होणारी घालमेल कादंबरीला अधिकच जिवंत करते. तोप्कापी राजप्रासाद, तिथले विलक्षण वैभवशाली आयुष्य, कपटकारस्थाने आणि करमणुकीचे अतिरेकी प्रकार यांनी कादंबरीची पार्श्वभूमी बनली आहे. हृाा साऱ्यांतून त्या युगाचं रंगीत वातावरण लक्षवेधीपणे पुढे येते.