Publisher's Synopsis
विजय तेंडुलकरांनी ज्या ज्या नाटकांचे अनुवाद केले ती सगळी त्या त्या भाषेतील क्लासिक्स मानली गेली होती. 'कुमारनी आगाशी' चे मूळ लेखक मधु राय हे गुजरातीमधील अत्यंत महत्त्वाचे नाटककार आणि त्यांचे 'कुमारनी आगाशी' हे गुजराती रंगभूमीवर गाजलेले नाटक. 'मी कुमार' हे नाटक एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्याच्या जवळच्या लोकांविषयी आहे. त्यांचे आपसातले ताणतणाव, रहस्य नाटकाच्या रचनेचा आधार घेऊन मांडले आहेत. त्यामुळे नाटकात पुढे काय घडणार याची उत्सुकता लागून राहते. १९८० च्या सुरुवातीला जेव्हा हे नाटक प्रथम सादर झालं तेव्हा ह्यातील स्त्री-पुरुष संबंध प्रेक्षकांना पचायला जड गेले असावेत. अतिशय धाडसाने, ताकाला जाऊन भांडं न लपवता या नाटकातील स्त्री-पुरुष संबंधाची मांडणी केली आहे. ही या नाटकाची जमेची बाजू आहे. स्त्री-पुरुष संबंधावरील मानसशास्त्रीय रहस्यनाटक असं ह्या नाटकाचं वर्णन करता येईल. नाटककार म्हणून तेंडुलकरांची जी खासियत आहे ती अनुवादक तेंडुलकरांना उपयोगी पडली आहे. मूळ कलाकृतीचा समतोल ढळू न देता केलेला हा अनुवाद आहे. - विजय केंकरे